Wednesday, January 9, 2013

जिन्हे नाझ है हिंद पर वो कहा हैं

"मेरा भारत महान"...लहानपणी खरेच खरे वाटायचे हे ! इतिहास , संस्कृती , भूगोल, विविधता आणि "मिले सूर मेरा तुम्हारा" ह्यानी एकदम पक्के मत बनवले होते ... सारे जहाँ से अच्छा..... (आता पूर्ण ओळ लिहीणे पण जड जात आहे)
हे शेवटचे कंसातल वाक्य त्या वयात कोणी बोलले असते तर एक चार-पाच तास तरी आमचा वाद रंगला असता..किंबहुना जास्तच !
Indian Army त जायचे होते मला ! कोणी मित्र आर्मीत गेले तर केवढा अभिमान वाटला होता त्यावेळी !
दर १५ ऑगस्ट ला झेंडावंदन करताना अगदी मनापासून Salute ठोकायचे मी ! छाती वर छोटा तिरंगा अगदी न चुकता मिरवायचे.
सावरकर, टिळक आणि नंतर नंतर गांधीना पण समजण्याचा प्रयत्न केला होता.....
भ्रष्टाचार, गरीबी आणि गलथानपणा हे शब्द काही नवीन नव्हते ..पण तरीही देश प्रेम वगैरे फार भारी अशी धुंदी होती !
पेपर मध्ये छापुन आलेले सगळे १०० टक्के खरे असे समजण्याचे दिवस ते ..... लोक पण सगळे खरे वाटायचे !!
College सुरु झाले ..मग brain drain वगैरे वर चर्चा रंगायच्या .... कधी मस्त रंगलेल्या मेहंदी चे नसेल तेवढे मला १८ पूर्ण झाल्यावर बोटावरच्या त्या काळ्या ठीपक्याचे अप्रूप वाटले होते...
आर्मी आपल्या आवाक्याबाहेर असल्याचे जाणवल्यानंतर आपल्या मुलाला आर्मीत घालू असे मनास पटवले होते...
एकंदरीत फार म्हणजे फार जीव होता माझा आपल्या भारतावर ...आपल्या मायभूमी वर....तिथली प्रत्येक अगदी प्रत्येक चांगली वाईट गोष्ट माझी होती.
आणि हे अगदी आता आता पर्यंत......
गेल्या काही वर्षापासून अगदी कुरतडतय मन .......१० जण येतात शेकडोंना मारतात ..त्यातला एक मोहरा ४ वर्षांनी फाशी वर चढल्यावर अगदी दिवाळी साजरी होते ! आणि लोक विसरूनही जातात कि म्होरक्या अजून तसाच आहे निर्धास्त...
इथे "ईट का जवाब पत्थर " नाही फुले उधळून होते....या या क्रिकेट खेळा ...गाणी गा....picture करा .....आणि एखाद दुसरे जवान मारले तर मात्र आम्ही निषेध नोंदवू हं !
विचार सुद्धा करवत नाही अशा रीतीने एका मुलीचा शेवट होतो आणि मेणब्त्त्यांचा भरगच्च खप होतो ! इथे आल्या गेल्या प्रत्येकालाच मग नोंदवायचे असते आपापले मत .... न्यूज वाहिन्या राहतात २४ तास गरळ ओकत !
निषेध सुद्धा करवत नाही एवढे मन सुन्न होते ! महागाई , भ्रष्टाचार वगैरे तर चावून चावून चोथा झालेले विषय .....
मेरा भारत महान या वाक्यातला फोलपणा आजकाल सारखा डोके वर काढत आहे.... कोणी म्हणाल लोक बदलले , सरकार लाचार आहे, देशाला का दोष द्या ......

जड वाटतेय हे लिहिताना.......

पण खरे सांगा , जिन्हे नाझ है हिंद पर वो कहा हैं ?

1 comment:

  1. khup diwasanni tuza likhan vachala...good. as usual very good.

    ReplyDelete